Friday, December 16, 2022

मूड आणि स्विंग्स!

चिन्मय बोरकर - chinmay.borkar@gmail.com 

स्मिता पाटीलला केवळ ३१ वर्षांंचे आयुष्य लाभले होते; त्यातही अभिनय क्षेत्रातली कारकीर्द जेमतेम ११ वर्षांंची. परंतु त्या काळातही तिने निर्माण केलेले अभिनयविश्व व त्यापलीकडे जाऊन तयार केलेले माणसांचे भावबंध विलक्षण होते. तिच्या भावविश्वात आलेल्या व्यक्तींच्या अंतरंगात तिचे व्यक्तिमत्त्व मिसळून जात असे, त्या व्यक्तीच्याही नकळत. त्याला वयाचे, नावाचे, हुद्दय़ाचे, प्रतिष्ठेचे बंधन नसे. स्मिता पाटीलच्या संपर्कात प्रथम पत्रकार म्हणून आलेली व नंतर जिवलग मैत्रीण झालेली अशीच एक पत्रकार ललिता ताम्हणे.

खरे तर ललिता ताम्हणे स्मिता पाटीलवर आत्मचरित्र लिहिणार होत्या. परंतु स्मिताच्या अकाली मृत्यूमुळे ते काम पुरे होऊ शकले नाही. परंतु स्मितासारख्या जगविख्यात अभिनेत्रीवर लिखित स्वरूपात व तेही मराठीत काही असणे आवश्यक होते. लौकिकार्थाने स्मिता ८० च्या दशकातील अभिनेत्री असली, तरी तिने साकारलेल्या व्यक्तिरेखांचा प्रभाव आजही तरुण अभिनेत्यांवर व अभिनेत्रींवर आहे. त्या व्यक्तिरेखांच्या भावमुद्रांपलीकडचा स्मिता पाटीलचा भावस्पर्शी चेहरा, चित्रपटातल्या प्रत्येक ‘फ्रेम’मधील घटना व्यापून टाकणारं अस्तित्व आणि त्यातून ‘आपलं’ वाटत जाणारं तिचं व्यक्तिमत्त्व याबद्दल अनेकांना कुतूहलमिश्रित गूढ आणि प्रेम वाटत आलेलं आहे. ललिता ताम्हणेने लिहिलेलं आणि प्रसाद महाडकरांच्या ‘जीवनगाणी’ने प्रसिद्ध केलेलं ‘स्मिता, स्मितं आणि मी’ त्या सर्व संवेदनशील मनातल्या विचारांना बऱ्याचशा प्रमाणात वाट मोकळी करून देऊ शकेल.

‘स्मिता, स्मितं आणि मी’ हे ललिता ताम्हणे यांनी स्मिता पाटीलवर लिहिलेल्या लेखांचं आणि मुलाखतींचं संकलन आहे. खुद्द लेखिकेनेच म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला औपचारिक असलेलं नातं एकेरीवर कधी आलं, ते दोघींनाही समजलं नाही. त्यामुळे भावनिक न होता त्या मैत्रीतून बाहेर पडून व्यक्तीकडे बघत, तिच्या अंतरंगात शिरणे आणि तरीही ते कोरडे न होता, माणूसपणाची संवेदना त्यात कायम ठेवणे ही अत्यंत कठीण कसरत होती. ललिता ताम्हणे त्यात बव्हंशी यशस्वी झालेल्या आहेत. स्मिता पाटीलचे विविध ‘मूड्स’ टिपणारी छायाचित्रे, चित्रपटातील प्रसंगांचे फोटो आणि त्या अनुषंगाने येणारे लेख व मुलाखती आणि स्मिताच्या आयुष्यातल्या घडत गेलेल्या घटना असे पुस्तक उलगडत जाते. प्रसाद महाडकरांनी जराही हातचे न राखता पुस्तकाची उत्तम निर्मिती केलेली आहे. शिवाय पुस्तकाचे संपूर्ण स्वरूप ‘ब्लॅक अण्ड व्हाईट’ असल्याने गतकाळाची व त्यातल्या व्यक्तिमत्त्वांची एक सुप्त जाणीव वाचकाला होत राहते; ‘स्मिता’ नावाच्या सावळ्याशा व्यक्तिमत्त्वालासुद्धा पूरक अशीच!

अभिनेत्री म्हणून स्मिता पाटीलने अल्पकाळात मिळवलेले यश अलौकिक होते. कॉस्टा गॅव्हरासारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या दिग्दर्शकाने स्मिताच्या चित्रपटांचे महोत्सव, मॉन्ट्रीयल येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात परीक्षक म्हणून काम करण्याचा बहुमान, भारत सरकारने दिलेली ‘पद्मश्री’ ही फक्त त्याची झलक. शिवाय हिंदीत मंथन, भूमिका, शक्ती आणि मराठीत ‘जैत रे जैत’ आणि ‘उंबरठा’मधील ‘सुलभा महाजन’ या भूमिका अजरामर झालेल्या आहेत. या सर्वांबद्दल, तिच्या आयुष्याकडे व चित्रपटांकडे बघण्याच्या दृष्टिकोनाबद्दल, व्यक्तिगत नातेसंबंधाबद्दल व होणाऱ्या मानसिक कोंडीबद्दल, एकटेपणाबद्दल स्मिता पाटील ललिता ताम्हणे यांच्याकडे मनमोकळेपणाने व काहीशा तत्त्वचिंतनाच्या अंगानेसुद्धा बोलली आहे. त्यामुळे कधी अभिनेत्री म्हणन, तर कधी व्यक्ती म्हणून ताम्हणेंना स्मिता कशी दिसत गेली, भासत गेली असे मनोगतरूपी चिंतनाकडे झुकणारे, तर कधी पत्रकार म्हणून तटस्थपणे बघणारे लेखनाचे स्वरूप आहे. त्यात भावनिकता आहेच, परंतु व्यक्ती म्हणून वेगाने बदलत जाणाऱ्या व स्मिताला दु:खात टाकणाऱ्या तिच्या आयुष्यक्रमात झालेला बदल स्वीकारतानाची मैत्रीण म्हणून वेदनामय असहायता सुद्ध आहे. अर्थातच त्या ‘असहायतेचं’ जगासमोर आलेलं ‘वास्तव’ वादग्रस्त हे होतं; विशेषत: शबाना आझमी या तिच्या समकालीन अभिनेत्रीबरोबरचे तिचे (बिघडलेले) संबंध आणि राज बब्बरशी लग्न करण्याचा तिने घेतलेला निर्णय; परंतु हे संवेदनशील विषय ताम्हणेंनी चांगले हाताळळे आहेत, त्यातील स्मिता पाटील या माणसाचा मान ठेवून व ‘नैतिकतेचे’ प्रस्थापित आणि चाकोरीबद्ध निकष न लावता! शबाना आझमींची या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांनी मुलाखतसुद्धा घेतलेली आहे. परंतु पुस्तकातला वैशिष्टय़पूर्ण भाग मात्र स्मिता पाटीलची ‘रेखा’शी न झालेली मैत्री हा आहे. खुद्द स्मिता पाटीलला रेखाशी ‘मैत्री’ करण्याची तीव्र इच्छा होती, परंतु रेखाने स्मिताला आयुष्यभर ठराविक मर्यादेपलीकडे मैत्री करू दिली नाही. स्मिताच्या मृत्यूनंतर मात्र याच रेखाला दु:खावेग अनावर झाला होता. आपल्या संबंधाबद्दल रेखा म्हणते, ‘की मी हिला जास्त जवळ येऊ दिलं, तर मी नकळत हिच्यात इनव्हॉल्व्ह होईन. हिच्यात दुसऱ्याला खेचून घेण्याची शक्ती आहे.’ विशेषत: सध्याच्या ‘पेज थ्री’च्या जमान्यात नायक-नायिकांना मादाम तुसाचे मेणाचे पुतळे बनवून त्यांच्या तथाकथित व्यक्तिगत आयुष्याचा बाजार मांडणाऱ्या पत्रकारितेत, रुपेरी पडद्यामागच्या ‘माणसांना’ वाचकांसमोर उभं करण्याचं काम हे पुस्तक करतं आणि आताच्या काळासाठी ते अत्यंत महत्त्वाचं आहे.

आणि तरीही पुस्तक वाचून झाल्यावर काहीसं अपूर्णत्वाचं भान येतं, स्मिता पाटील म्हणजे काय, हा प्रश्न वाचकाला भेडसावत राहतो. दूरदर्शनवर बातम्या सांगणारी वृत्तनिवेदिका ते जगविख्यात अभिनेत्रीचा प्रवास ‘कसा’ घडत गेला असावा, याचं स्मिताच्या व्यक्तिमत्त्वाचं उत्तर वाचकालाच शोधावं लागतं. स्मिताचे वडील राजकारणी होते, आई प्रथम गृहिणी व नंतर नर्स. घरात समाजवादाचा, जेपींचा प्रभाव होता. विचार पुरोगामी होते आणि अर्थातच ‘स्मिता’च्या मनाचा एक कोपरा त्यातून घडत गेला. परिस्थिती व नवऱ्याने केलेल्या अन्यायाविरुद्ध घर सोडून जाणारी ‘उंबरठा’मधील ‘सुलभा महाजन’ त्यातूनच साकार झाली. स्त्री चळवळींशी जोडली गेल्याने, आपल्या आयुष्यातले ‘क्रांती’कारक निर्णय ‘स्वत:च’, काही वेळेस, कुटुंबाशी फारकत घेतल्याने, समांतर चित्रपटांतील भूमिका असल्याने तीच ‘खरी’ स्मिता असावी असा जगाचा समज झाला; परंतु प्रत्यक्षात तिला तसं व्हायला आवडलं असतं. तिला माणसांचा सोस होता आणि माणसांबरोबरच्या नात्यांतून मिळणाऱ्या ‘प्रेमा’च्या ती शोधात असावी! प्रेमातून विरक्ती येते आणि विरक्तीतून अध्यात्म, म्हणूनच कदाचित जीवनातल्या आपल्या सर्वात सुंदर निर्मितीचा, प्रतीकचा जन्म झाल्यानंतर मृत्यूपूर्वी ती सलग १५ दिवस आजारी अवस्थेत व मनाने संपूर्ण खचल्यावरही ‘मोगरा फुलला’ ही ज्ञानेश्वरांची ओवी त्यांच्यासाठी गुणगुणत असे. जीवनाचं अंतिम ध्येयचं साध्य झाल्यासारखं! त्या अर्थाने स्मिताला ‘ध्येय’ नव्हतं. तिला ‘मूड स्विंगस्’ होते आणि त्यातल्या अनिर्णयातून येणारे ‘बोअरडम’. आपलं सर्वस्व दिल्यानंतरही, येणाऱ्या अपूर्णत्वाची जाणीव, हीच आपली ‘उणीव’ असावी, असं बहुधा तिला वाटलं असावं. ते समीकरण कायमचं सोडविण्यासाठी तिने बहुधा ‘राज’शी लग्न केलं-परंतु मुळातच गणित चुकलं होतं!

मूड आणि स्विंग्स! चिन्मय बोरकर - chinmay.borkar@gmail.com  स्मिता पाटीलला केवळ ३१ वर्षांंचे आयुष्य लाभले होते; त्यातही अभिनय क्षेत्रातली कार...